राम मंदिर / Ram Mandir Shahapur

          ब्राम्हणआळीतील राम मंदिर हे एक शतकापूर्वीचे आहे. हे मंदिर इतर मंदिराप्रमाणेच साधे परंतु व्यवस्थित आहे. श्री राम, लक्ष्मण, सीता यांच्या संगमरवरी मूर्ती गाभाऱ्यात चौथऱ्यावर असून त्यांच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती आहे. उजव्या व डाव्या हाताला प्रत्येकी तीन याप्रमाणे खांब असून या खांबावर आधारलेला लाकडी पोटमाळा  आहे. गाभाऱ्याच्या समोर काहीसे ऐसपैस प्रेक्षकगृह आहे. मुख्य मंदिराच्या वरती पोटमाळा किंव्हा सज्जा बांधण्याची पद्धत साधारणपणे पेशवे काळात रूढ झाली असे मानले जाते. मंदिरातील धार्मिक कार्यक्रम विशेषत :भजन, प्रवचन, कीर्तन, किंव्हा जन्मोत्सव स्त्रीयाना बघता यावा यासाठी हि व्यवस्था सुरु झाली असे बोलले जाते. अनेक जुन्या मंदिरांची अशी व्यवस्था आहे.

         ब्राम्हणआळीतील ह्या मंदिराचा जीर्णोद्धार कसारा येथील बागेसर हरीलाल अग्रवाल यांनी केला. तत्पूर्वी मंदिर बैठे असून जमीनही साधी सारवणाची होती. चातुर्मासातील व्रतवैकल्ये आणि रामनवमी येथे साजरी केली जाते. त्या निमित्ताने येथे प्रवचने, कीर्तने होतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला सिमेंटने बांधलेल्या चौकोनात हनुमानाची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या वरील बाजूस शेषशाही विष्णू व त्यांचे पंचायतन चित्रित केलेले आहे.