वेताळ मंदिर : वेताळेश्वर / Vetal Mandir Shahapur Thane

इतर गावांप्रमाणेच शहापूरमध्ये वेताळ मंदिर दिसून येते. वेताळ हि ग्रामदेवता असून मानवाच्या भयभावानेतून या देवतेचा उदय झाला आहे. बहुतांशी ग्रामदेवता या स्त्रीदेवता आहेत मात्र वेताळ हि पुरुष देवता आहे. वेताळेश्वर हा गावाचा रक्षक मानला जातो गावाच्या कोणत्यातरी हद्दीवर हि देवता स्थापन केलेलि असते. इतर ग्रामदेवतेप्रमाणेच वेताळाची सुद्धा कोणतीही मूर्ती नसते. शेंदूर लावलेला गोलाकार, चौकोनी, आयताकृती वा काहीसा आकारहीन दगड असतो. त्याचीच पूजा केली जाते. वेताळही भूत प्रेत यांची देवता असून त्याच्या पूजनाने  भूतबाधा होवू नये वा अकाली मृत्यू येवू नये अश्या मृत्यू व भीतीच्या भावनेतून वेताळाची पूजा केली जाते.वेताळदेवता कधी उदयास आली हे सांगणे काठी आहे. शहापूरमध्ये ब्राम्हणआळीत  वेताळ मंदिर आहे. हे वेताळमंदिर शहापूरचे  ग्रामदैवत असून गावाच्या धार्मिक परंपरेत वेताळेश्वराला महत्व आहे.

शेतीची कामे सुरु करण्यापूर्वी शेतकरी कुटुंबाकडून वेताळेश्वराला नारळ अर्पण केला जातो. देवतेचा कौल घेवूनच मंगल कार्य केले जाते. प्रथेप्रमाणे जत्रा तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा, श्री गणेशोत्सव, शिवजयंती वगेरे उत्सव साजरे केले जातात. मंदिराची व्यवस्था परंपरेने गोणे कुटुंबीयांकडे आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून कौलारू छपराऐवजी सिमेंट कौक्रीटचे छत तसेच पूर्वीच्या लाकडी खांबांएवजी सिमेंटचे खांब, लोकांडी दरवाजा असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. वेताळेश्वराची फेरी निघत असल्याने मंदिराला भिंती नाहीत. अश्यारीतीने हे वेताळ मंदिर शहापूरच्या धार्मिक जीवनातील महत्वाचा भाग आहे.