माहुली धबधबा / Mahuli Waterfall Shahapur Near Thane

 

पावसाळा सुरु झाला कि नकळत पावले वळतात ती निसर्गाच्या सानिध्यात. मनमुराद आनन्द लुटण्यासाठी. त्यामुळे पावसात कधी धबधब्याच्या ठिकाणी तर कधी ट्रेकींगसाठी डोंगर दरयात फिरून वीकेंड मौज मस्तीत घालावण्यासाठी तरुणाई जोषात पर्यटनस्थळी निघते.

शहापूर तालुक्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला धबधबा सध्या तरुणाई साठी आकर्षण ठरला असून येते तरुणाई सह पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र येथे पर्यटकांनी निसर्गाच्या प्रेमात आणि वेडात आपले भान न हरवता निसर्गाचा मनमुराद आनन्द घ्यावा असे आवाहन इथल्या ग्रामस्थांनी केले आहे.

पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावी असे हे ठाणे जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण म्हणजे शहापूर पासून ७ कि. मी. अंतरावर असलेला माहुली किल्ला. ह्याच्या पायथ्याशी असलेले हे धो धो कोसळणारे धबधबे. पाहताक्षणी प्रेमात पडावे असे त्यांचे मनोहारी रूप, पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ पाडते. एकूण ३ धबधबे रांगेत पर्यटकांची प्रतीक्षा करत आहेत असा जणू भासच होत असतो.



धबधब्या पर्यंत जाण्यासाठी माहुली निसर्ग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पायवाट बनवलेली आहे. वळण वाटा असलेला रस्ता, चालताना झोंबणारा गार वारा, संपूर्ण हिरवीगार झाडी, डोंगरावर उगवलेले गवत ह्यामुळे पर्यटकांना येते जणू स्वर्गाचा भासच होतो.
धबधब्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर उंचावरून धो धो पडणारे पाणी पाहताना, भिजल्या शिवाय रहावतच नाही. धबधब्याच्या जवळ जाताच पाण्याचे तुषार आपल्याला आकर्षित करतात. फक्त हि वाट जरा अवघड असल्याने चढताना आणि उतरताना पायाखालचा दगड सरकणार नाही ना, याची काळजी घ्यावी. तिसरा धबधबा शंभर फुट पेक्षा जास्त उंचीवरून धो धो कोसळतो, त्यमुळे त्याच्या खाली आपला टिकाव लागण कठीण आहे, म्हणून जास्त जवळ न जाता लांबूनच आनंद घ्यावा.